आगामी निवडणुकांसाठी अजून महाविकास आघाडीचे चर्चा केलेली नाही – शरद पवार यांचे वक्तव्य
पुणे, ६ मार्च २०२३: राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राहणार का याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता “ती चर्चा माझ्याशी कुणी केलेली नाही. त्या चर्चेत मी नाही. या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीने दुसरे सहकारी आहेत. ते बसून निर्णय घेतील”, असे त्यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीवरील संभ्रम कायम ठेवला आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मविआकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपाला पराभवाची धूळ चारली हेमंत रासनेंचा पराभव करून धंगेकरांनी २८ वर्ष भाजपाच्या हातात असणारा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसकडे आणला. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला असला, तरी विरोधात उभ्या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरू लागली असताना शरद पवारांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांवरून महाविकास आघाडीनं पुढील निवडणुका एकत्र लढल्यास भाजपासमोर आव्हान निर्माण करता येईल, असं गृहितक राज्यात विरोधकांकडून मांडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मविआमधील अनेक नेतेमंडळी सूचक प्रतिक्रिया देत असले, तरी त्यावर अद्याप ठोस भूमिका मविआकडून किंवा आघाडीतील कोणत्याही घटकपक्षाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आघाडीचा नेमका निर्णय काय असेल? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. “ती चर्चा माझ्याशी कुणी केलेली नाही. त्या चर्चेत मी नाही. या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीने दुसरे सहकारी आहेत. ते बसून निर्णय घेतील. विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मविआच्या लोकांना एकत्र ठेवणं आणि एकत्र निर्णय घेणं आणि एकत्र निवडणुकांना सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. सध्या लोकांना बदल हवाय हे मी बघतोय. मविआच्या सगळ्या नेत्यांशी आम्ही बोलणार आहोत. बहुसंख्य लोकांनी मला सांगितलं की मविआचा उमेदवार, त्यांनी केलेल्या कामाची नोंद त्यांनी घेतली आहे”, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी रवींद्र धंगेकर यांचं कौतुकही केलं. “हा उमेदवार कधीच चारचाकीमध्ये बसत नाही. तो दोन चाकींवरच आहे. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचं लक्ष याच्याकडे होतं. त्याचा लाभ नक्की होईल, असं वाटलं जे १०० टक्के खरं ठरलं. मविआचे सगळे घटक मनापासून राबले त्याचा हा परिणाम आहे. निवडणूक झाल्यानंतर हाती आलेल्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली की ज्या व्यक्तीला निवडून दिलं, ती व्यक्ती वर्षानुवर्षं सामान्य लोकांमध्ये कोणतीही अपेक्षा न करता काम करणारी आहे”, असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप