महाराष्ट्र: कारागृहातील गर्दी टाळणेसाठी कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात

पुणे, ३ मार्च २०२३: कारागृहातील अति गर्दीमुळे आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यातील धोका टाळणेसाठी कारागृहातील २० टक्के कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाणार आहे. त्यासाठी निकष ठरवून यासाठी कैदी पात्र करण्यात आले आहेत.
संघटित गुन्हेगारी, देशविघातक कारवाया, दहशतवादी कारवाया, नक्षलवादी, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, बलात्कारी गुन्हे, व्यावसायिक खुनी व इतर अतिगंभीर गुन्ह्यातील बंदी वगळता एका वर्षावरील शिक्षा झालेल्या सर्व बंद्यांना निव्वळ एक वर्ष किंवा जन्मठेपेच्या बाबतीत पाच वर्ष शिक्षा भोगल्यानंतर खुले कारागृहात वर्ग करण्यात येते.
खुले कारागृहात बंद्याने एक महिना शिक्षा भोगल्यानंतर ३० दिवस सर्वसाधारण माफी देण्यात येत असते . बंद्यांची व नातेवाईकांची भेट प्रत्यक्ष समोरा समोर देण्यात येत असते. तसेच बंद्यांना खुले कारागृहाचे शेतीत ,कारखाना विभागात काम दिले जाते. बंदी मोकळ्या हवेत शिक्षा भोगत असल्याने त्यांचे जीवनमान सुधारते.

सध्या राज्यात १९ खुले कारागृह असून १ हजार ५१२ पुरुष व १०० महिला बंदी क्षमता आहे. २०२२ मध्ये खुले कारागृहासाठी पात्र असलेल्या १ हजार ५७१ पुरुष बंदी व ४५ महिला बंदींना खुले कारागृहासाठी पात्र करण्यात आले होते. परंतू सर्वच खुले कारागृहात पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने बरेच बंदी खुले कारागृहात जावू शकले नाहीत. त्यामुळे अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांचे अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये खुले कारागृहाची बंदी क्षमता साधारणपणे २० टक्केने वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच भादंवि ३९२ ते ४०२ कलमांमध्ये शिक्षा सुनावलेल्या बंद्यांची त्या कलमातील शिक्षा संपल्यानंतर त्यांना खुले कारागृहासाठी पात्र करून इतर कलमातील उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी बंद्यांना खुले कारागृहात वर्ग करण्यात यावे. ६० वर्षावरील कैद्यांना बंद्यांना खुले कारागृहात वर्ग करावे असाही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या दोन्ही धोरणात्मक निर्णयामुळे बंद्यांना खुले कारागृहाचा लाभ मिळेल .

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप