“रोज सकाळी वाजणारा बिन पैशांचा संजय राऊतांचा भोंगा बंद करणार” – नितेश राणे यांची घणाघाती टीका

मुंबई, १ मार्च २०२३: खासदार संजय राऊत म्हणजे रोज सकाळी वाजणारा बिन पैशांचा भोंगा आहे तो बंद कसा करता येईल याचा उपाय आम्ही शोधतो आहोत अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

विधानसभेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणला जावा असं म्हटलं आहे. त्यानंतर सभागृहाबाहेरही त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत १०० दिवस तुरुंगात राहून आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

संजय राऊत हा सटकलेला माणूस आहे, हे मी सांगत नाही तर त्याच्या जवळचे लोक बोलत आहेत. त्याच्या जवळच्या लोकांनी हेदेखील सांगितलं की तो अवेळी बोलतो, अंधारात जाऊन बसतो, १०० दिवस तुरुंगात राहिल्याने तो नावं विसरतो अशा सटकलेल्या माणसाने समाजात जास्त वेळ फिरू द्यायला नको. भटक्या कुत्र्याला जसं पकडतात तसं संजय राऊतला पकडलं पाहिजे. पोलिसांना जमत नसेल तर मी तेच सांगितलं दहा मिनिटं संरक्षण काढा मग आम्ही आमच्या पद्धतीने उपाय करतो असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

आम्ही आज अध्यक्षांना विनंती केली आहे की संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणावा. शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. ज्या मतांवर संजय राऊत निवडून आले आहेत ती मतं आमच्या आमदारांची मतं आहेत. हिंमत असेल तर संजय राऊतने सुरक्षा सोडून द्यावी आणि महाराष्ट्रात फिरून दाखवावं. ८ मार्चला अध्यक्ष निर्णय देणार आहेत. एक निर्णय इथे होईल दुसरा निर्णय रस्त्यावर होईल असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

संजय राऊत स्वतःला मोठा शूरवीर समजतो. बाळासाहेब ठाकरे आणि माँ यांचं आपसात जमायचं नाही असं लोकप्रभा मध्ये लिहिणारा संजय राऊत आम्हाला काय शिकवतो. जो बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही तो कुणाचा होणार? असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप