नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करणे उद्धव ठाकरेंना मान्य नव्हते – दीपक केसरकरांचा खुलासा 

मुंबई, ६ ऑगस्ट २०२२: सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे संयुक्त सरकार असले तरी याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची भाजपाबरोबर चर्चा सुरू होती. मात्र राज्यातील १२ आमदारांचे निलंबन आणि नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश यामुळे ही बोलणी थाबंल्याचा खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

 

केसरकर म्हणाले,” उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधाला जास्त महत्त्व देतो. त्याच वेळेला त्यांनी आपल्या पदाचा त्याग करायचे ठरवले होते. पुढच्या १५ दिवसांत ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. मात्र दरम्यानच्या काळात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. निलंबन झाल्यानंतर भाजपाकडून निरोप आला होता. आपली बोलणी सुरू आहे. असे निलंबन योग्य नाही, असे मत भाजपाने व्यक्त केले होते. पुढे कोर्टाने हे निलंबन रद्द ठरवण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे उद्धव ठाकरे यांना आवडले नाही. याच कारणामुळे ही बोलणी थांबली.”

“आम्ही आसामला निघून गेल्यानंतरही आम्ही आमच्या प्रतिनिधीला उद्धव ठाकरेंशी बोलणी करायला पाठवले होते. आमच्या प्रतिनिधींना उद्धव ठाकरेंनी सांगितले होते की, झालेले विसरून जाऊ. आपण एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा. आम्ही आघाडी तयार करायला तयार आहोत. मात्र यासाठी भाजपा पक्ष तयार नव्हता. तसेच आम्ही आसाममधील आमदारही तयार नव्हतो,” असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.