बाळासाहेब थोरात नाराजच;पुढची बैठक मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२३ : विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करत आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीनंतरही थोरातांची नाराजी दूर करणे शक्य झाले नाही. आता पुढची बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत होणार आहे.

नाशिक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता ही निवडणूक झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाकडे विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा सादर करून यापुढे नाना पटोळे यांच्यासोबत काम करणे शक्य नाही असे त्यामध्ये नमूद केले होते त्यामुळे थोरात यांची बाजू समजून घेण्यासाठी व नाराजी दूर करण्यासाठी आज एस के पाटील यांनी मुंबईत भेट घेतली त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

थोरात म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं. आज माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे,” अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

“प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत,” असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, तुमची नाराजी दूर झाली का? या प्रश्नाचे बाळासाहेब थोरात यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात बाळासाहेब थोरात काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप