अजून एका आमदाराचा अपघात; दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी

अमरावती, ११ जानेवारी २०२३ : मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत.

आज ( ११ जानेवारी ) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.

दरम्यान, एक महिन्यांच्या कार्यकाळात राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. २४ डिसेंबरला भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. या अपघातात गोरे आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते.

४ जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांना मुक्का मार लागला आहे. सुदैवाने मुंडे या अपघातातून बचावले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी कशेडी घाटात अपघात झाला होता. त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती. मात्र, अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती.