मुक्ता टिळक अनंतात विलीन; चंद्रकांत पाटील यांना अश्रू अनावर
पुणे, २३ डिसेंबर २०२२ ः भाजपच्या आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी भाजपसह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्याबद्दल बोलताना पाटील यांना अश्रू रोखता आले नाहीत त्यामुळे वैकुंठ स्मशानातील वातावरण धीर गंभीर झाले होते.
मुक्ता टिळक यांना कर्करोग झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. एकीकडे उपचार आणि दुसरीकडे राजकीय व सामाजिक कार्यातही त्या कार्यरत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालविल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी (ता. २२) दुपारी साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघासह इतर भागातील कार्यकर्त्यांनी टिळक वाड्याकडे धाव घेतली. तर काही जण रुग्णालयाकडे गेले. रात्री उशिराही टिळक वाड्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होती.
आज सकाळी ९ वाजता मुक्ता टिळक यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळक वाड्यात ठेवण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह इतर पदाधिकारी अधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. कार्यकर्ते, मतदारसंघातील नागरिक, महिला यांनीही अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
केसरी वाडा ते वैकुंठ स्मशानभूमी अंतयात्रा काढण्यात आली. वैकुंठ स्मशानभूमी इथे शासनातर्फे पालकमंत्री पाटील, जिल्हाधिकारी देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलिसांनी बंदुकीतून तीन फैरी झाडत सलामी दिली. यानंतर टिळक कुटुंबीयांकडे तिरंगा सुपूर्त करण्यात आला.
वैकुंठ स्मशानभूमीत चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ‘‘भीषण आजाराशी संघर्ष करताना मुक्ता टिळक यांचे काल निधन झाले. नगरसेवक, महापौर, आमदार म्हणून यशस्वीपणे काम केले. लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सून म्हणून कार्य करताना त्यांच्या त्यांचे विचार त्या स्वतः जगत आल्या. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संघटनेचा आदेश काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी व लक्ष्मण जगताप यांनी मतदान केले म्हणूनच भाजप निवडणूक जिंकू शकला,’’ असे सांगतानाच पाटील यांना अश्रू अनावर झाले अन या परिसरात निशब्दाता पसरली.