महामोर्चाला विकत आली गर्दी ; भाजपकडून पैसे वाटतानाचा व्हिडिओ केला शेअर

मुंबई, १७ डिसेंबर २०२२: मुंबईत महाविकास आघाडीकडून ‘महामोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारे कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. पण या मोर्चाला जमलेल्या गर्दीवर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला थोडीफार गर्दी जमली होती, पण ही गर्दी पैसे देऊन जमवली होती का? असा सवाल उपाध्ये यांनी विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये काही कार्यकर्ते काँग्रेसचे गमछे गळ्यात घालून पैसे घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

केशव उपाध्ये यांनी फोनवरून ‘एबीपी माझा’शी साधलेल्या संवादानुसार, संबंधित व्हिडीओ मुंबईतील पत्रकार संघानजीक काँग्रेस कार्यालयाजवळील आहे. यामध्ये काँग्रेसचे गमछे घातलेले काही लोक पैसे घेताना दिसत आहेत.

यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, “मोर्चा सुरू असताना काही लोक काँग्रेसचे गमछे घालून पैसे घेताना दिसत आहेत. यावरून लक्षात येतं की मुळात या मोर्चाला प्रतिसाद नव्हता. ओढून ताणून लोक आणली. जी थोडीफार गर्दी जमली ती अशा पद्धतीने पैसे वाटून आणली का? असा आमचा प्रश्न आहे. याचं उत्तर स्वत: शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. महाविकास आघाडीबाबत जनतेत विश्वास उरला नाही, त्यामुळे काहीतरी खटाटोप करून गर्दी जमा करायची होती. ती अशा प्रकारे पैसे देऊन जमवली का? असा आमचा प्रश्न,” असा सवालही उपाध्ये यांनी विचारला.