सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी
पुणे, १५ डिसेंबर २०२२ ः वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या
नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना आज अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘‘माझ्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागते,’’ असे सांगत यावर पदडा टाकला.
सुषमा अंधारे यांच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या संदर्भाने केलेली वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी या मागणीने जोर धरला होता. त्यासंदर्भात अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.
अंधारे म्हणाल्या, माझ्या भाषणांमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असल्यामुळं माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. मी कबीरपंथीय असल्यानं कुणाच्याही श्रद्धेच्या आड येत नाही, कर्मकांड न मानता चैतन्य मानते. तरीदेखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकीय सूडबुद्धीतून माझा विरोध केला जात आहे. यामध्ये भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचेच लोक आहेत, जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही, त्या लोकांनी कोरोनाकाळात याच लोकांनी स्टंट केला होता, आता तेच माझ्यावर टीका करत आहेत. माझा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी काल माझी अंतयात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आलेल्या असून माझी भाजपच्या वारकऱ्यांनी दखल घेतल्याबद्दल आनंदी आहे. तसेच वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असे अंधारे स्पष्ट केले.