काँग्रेसला आमदार फुटण्याची भिती; विजयी उमेदवार चंदिगडला हलवले
दिल्ली, ८ डिसेंबर २०२२ः हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतरणाचा इतिहास बदलणार की नाही हे दुपारी एक वाजेपर्यंत समोर आलेल्या मतमोजणीच्या कलांमुळे स्पष्ट झालं आहे. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. प्राथमिक आकडेवारीमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून हाच कल कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिमाचलमधील ४० जागांपैकी २५ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. हीच आघाडी कायम राहिल तर हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलण्याची परंपरा कायम राहील आणि काँग्रेस सत्तेत येईल. अजूनही आकडेवारी बदलण्याची शक्यता असतानाही काँग्रेसने ताकही फुंकून पिण्याची भूमिका स्वीकारल्याचं दिसत आहे.
सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना चंडीगडमध्ये नेलं जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचं प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार तातडीने चंडीगडला रवाना होतील. या ठिकाणीहून या उमेदवारांना अन्य राज्यात नेलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. हिमाचलमध्ये जिंकलेल्या उमेदवारांची जबाबदरी ही भूपेंद्र सिंह हुड्डा, भूपेश बघेल आणि राजीव शुक्लांकडे सोपवली जाणार आहे. भूपेंद्र हुड्डा सध्या चंडीगडमध्ये आहेत. तर भूपेश बघेल आणि शुक्ला लवकरच चंडीगडमध्ये दाखल होणार आहेत.
काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पक्ष अंतिम निकालाची वाट पाहत आहे. पक्षाने पहिलं प्राधान्य विजयी उमेदवारांना सुरक्षित स्थळी हलवण्यास दिलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेकजण आहेत. मात्र ही जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर टाकली जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. प्रतिभा सिंह प्रदेशाध्यक्षा असण्याबरोबरच वीरभद्र सिंह यांच्या पत्नी असल्याने त्यांच्याकडे संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहे. मात्र अंतिम निर्णय हा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल. राज्याचे प्रभारी राजीव शुक्ला, भूपेश बघेल आणि भूपेंद्र हुडा हेच विजयी उमेदवारांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेतील, असं काँग्रेसने सांगितलं आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही भाजपाला घोडेबाजार करता येऊ नये यासंदर्भातील दक्षता आम्ही घेऊ असं म्हटलं आहे.