बावनकुळे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करा, तर पवारांनी केले संरक्षण

पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ ः राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजप पदाधिकारी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. आव्हाड यांनी विनयभंगच केला आहे, आम्हीही व्हिडीओ पाहिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावाच पण त्यांची शरद पवार, अजित पवारांनी राष्ट्रवादीतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. मात्र अजित पवार यांनी आव्हान यांच्या बाजूने उभे राहात, आव्हाड यांनी राजिनामा देण्याची गरज नाही, आम्ही सोबत आहोत, असे वक्तव्य केले.
या दोन्ही नेत्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी स्वतंत्रपणे संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिवाय त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आता जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. तर आव्हाडांच्या राजीनाम्याच्या निर्णयास गृहमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राजकीय जीवनात काम करत असताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण काम करतो, शरद पवारांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वाखाली आपण काम करतो आहोत. त्यांनी तर स्वत:च्या राजकीय जीवनात अनेकप्रकारे चढउतार पाहिले आहेत, अनेकप्रकारची स्थित्यंतरं पाहिलेली आहेत. कधी आपण सरकारमध्ये तर कधी विरोधी पक्षात आपण असतो, त्यामुळे अनेक घटना घडत असतात. परंतु ज्याप्रकारे सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात काम करत आहे, एकतरी मध्यंतरी माझ्या स्वत:च्या पाहण्यात आलं, तो चित्रपट बंद पाडण्यासाठी गेले असताना ज्यांना मारहाण झाली, तेच म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी मला त्यात वाचवलं. असं असतानाही जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचं काम झालं. रात्रभर एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं.”

याचबरोबर, “कायदा,सुव्यवस्था चांगली ठेवणं सरकारचं काम आहे त्यामध्ये दुमत नाही. प्रत्येक व्यक्तीने संविधानाचा आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर केला पाहिजे, कायद्याचा आदर केला पाहिजे. याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. ” असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.