राज्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्र्यांकडे, त्यामुळे फडणवीस यांची भेट घेणार – एकनाथ शिंदे यांना संजय राऊतांचा टोला

मुंबई, १० नोव्हेंबर २०२२ः पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केल्यानंतर आज राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. राज्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असं राऊत म्हणाले.

“उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे,” असं राऊत म्हणाले. यावर पत्रकारांनी एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून टीका होत असतानाच तुम्ही फडणवीसांची भेट घेणार असल्याचं म्हणत आहात असं विचारलं असता या प्रश्नावरही राऊत यांनी उत्तर दिलं. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी तुरुंगातील दिवसांबद्दल भाष्य करतानाच मुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याबद्दल आपल्या मनात तिळमात्र शंका नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांनी घेतलेले काही निर्णय योग्य असल्याचं सांगत फडणवीसांचं कौतुक केलं आहे. “राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. मी विरोधाला विरोध करणार नाही. गरिबांना घरं देण्याचा प्रयत्न, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय मला चांगला वाटला. चांगल्या निर्णयांचं स्वागत केलं पाहिजे,” असं राऊत म्हणाले.

राऊत यांनी फडणवीसच राज्याचं नेतृत्व करत असल्याचं म्हणत शिंदेंना टोला लगावला. “नेतृत्व फडणवीस करत आहेत. उपमुख्यमंत्रीच सगळीकडे दिसतात. निर्णय घेतात. मी त्यांना लवकरच भेटणार आहे,” असं राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून टीका होत असताना फडणवीसांना भेटण्याबद्दल तुम्ही बोलताय असं विचारलं असता राऊत यांनी, “उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा असतो,” असं सांगितलं.

इतकच नाही तर पुढे बोलताना राऊत यांनी, “प्रधानमंत्री देशाचे असतात. मी मोदी, शाहांना दिल्लीत जाऊन भेटणार आहे. त्यांना माहिती देणार आहे की नेमकं माझ्याबरोबर काय घडलं,” असंही म्हटलंय.