संजय राऊत सुटले त्याचा आनंद, पण त्यांच्या धाडसाचे कौतूक – उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या जामिनावर पहिली प्रतिक्रिया

मुंबई, १० नोव्हेंबर २०२२: “संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंदानंतर दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. या आनंदाबरोबरच संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचबरोबर माझे जीवलग मित्रही आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे.”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुरुवारी (१० नोव्हेंबर) संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली.

“आता स्पष्ट झालं आहे. काल न्यायालयाने जो निकाल दिला त्या न्याय देवतेचे मी आभार मानतो. या निकालपत्रात अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरिक्षणं त्यांनी नोंदवली आहेत. त्यामुळे हे जगजाहीर झालंय की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीवप्राण्याप्रमाणे वागत आहेत. सरकार त्यांना ज्याच्या अंगावर जा म्हणाले त्याच्या अंगावर जात आहेत.

बेकायदेशीरपणे जात आहेत आणि हे सर्व जग बघत आहे. मागील ८-१५ दिवसांमधील केंद्रीय कायदामंत्री रिजूजू यांची वक्तव्य आता केंद्र सरकार न्याय देवतेलाही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे की काय असं दाखवणारी आहेत.

त्यांनी न्यायवृदांवरच शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्वसामान्यांच्या आशेषा किरण न्यायालय असते. केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर देशातील तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे. न्याय देवतेवर भाष्य करणं हासुद्धा गुन्हा आहे. त्यावर केंद्रीय कायदा मंत्रीच भाष्य करत आहे. हा गुन्हा होऊ शकतो का याची दखल न्याय देवता घेईलच. पण एक नक्की की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर अटक केले जात आहे, केसेस केल्या जात आहेत.

“न्यायालयाने दणका देऊनही पुन्हा संजय राऊत यांना नव्या खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एवढ्या चपराकीनंतर लाच वाटण्याइतकं हे केंद्र सरकार संवेदनशील असतं, तर अशा घटना घडल्या नसत्या,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.