तीन महिन्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक
मुंबई, 9 नोव्हेंबर 2022: जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संजय राऊतांना अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी पीएमएलए न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात आला. मात्र, राऊत हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता राऊतांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ईडीकडून केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर राऊत यांनी नियमीत जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाला ईडीने विरोध केला. राऊत हे पत्राचाळ पुनर्विकासात सक्रिय सहभागी होते. राऊत हेच पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी नातेवाईक प्रवीण राऊत यांच्या आडून हा घोटाळा केल्याचा आरोपही ईडीने राऊत यांच्या जामिनाला विरोध करताना केला होता.
संजय राऊत यांना ही मालमत्ता खरेदी करण्यात रस होता आणि काही लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या पत्नीच्या खात्यात १३ लाख रुपये जमा केले. संजय राऊत यांना दु:खी करायचे नव्हते म्हणून हे करण्यात आले. पैसे जमा झाल्याचे पुरावे आणि राऊत यांनी त्याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाकडे सिंह यांनी यावेळी न्यायालयाचे लक्ष वेधले. राऊत यांनी १.०६ कोटी रुपयांसाठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न जामीन अर्जात केला आहे. मात्र त्याचवेळी २.२ कोटी रुपयांच्या स्मरणपत्रासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असे ईडीचे म्हणणे आहे.
दरम्यान, राजकीय आकसापोटी आपल्याला याप्रकरणी गोवण्यात आले असून आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी जामिनाची मागणी करताना केला आहे. प्रवीण राऊत यांना मूळ गुन्ह्यात जामीन मंजूर झाल्याचाही दावा राऊत यांनी जामिनाची मागणी करताना केला आहे.