Pune: खासदार मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रीया, शहरातील खासगी रुग्णालयात गुडघ्यावर उपचार

पुणे, १४ मार्च २०२६ः केंद्रीय विमान व नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. याची माहिती स्वतः खासदार मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांना नेमके काय झाले आहे याविषयी देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच, एक महिना विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी २९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेविषयी सांगितले. त्यावेळी त्यांना कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. इतकी वर्ष होऊन त्रास वाढू लागल्याने अखेर डॅाक्टरांनी शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नसल्याचा सल्ला दिला. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली. खरेतर संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या सगळ्याचे काय? असा प्रश्न त्यांनी स्वतः केला आहे. तसेच, दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतो आहे. पण, मला माहिती आहे तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने. अशी ग्वाहीही मोहोळ यांनी दिली आहे.