पुणे: मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचा कटपोलिसांना खोटी माहिती देणारा अटकेत, लोणावळा पोलिसांची कारवाई

लोणावळा, 3 आॅक्टोबर 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देणाऱ्या एकास लोणावळ्यातून अटक करण्यात आली.

अविनाश अप्पा वाघमारे (वय ३६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, साठे चाळ, घाटकोपर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघमारे लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी आला होता. हाॅटेलमध्ये त्याने दारु प्याली. पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याने त्याने हाॅटेलमधील व्यवस्थापक आणि कामगारांशी वाद घातला. दारुच्या नशेत त्याने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. हाॅटेलचे नाव सांगून वाघमारेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांच्या पथकाने वाघमारेला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर तपास करत आहेत.