देवेंद्र फडणवीस पेशव्यांचे उत्तराधिकारी: संजय राऊतांची टीका

मुंबई, २ सप्टेंबर २०२४: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक विधान केलं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असून ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत. शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी शिवाजी महाराजांचे साम्राज्य लयास नेले. फडणवीस हे त्या पेशव्याचे उत्तराधिकारी आहेत, अशी टीका राऊतांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. महाराजांनी स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता. काँग्रेसने आजवर आम्हाला चुकीचे शिकवले आहे. त्यांनी माफी मागावी, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. हे भाजपचे लोक चिंतन बैठका खूप घेतात. एकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि संघर्ष यावर चिंतन बैठक बोलवावी. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, असे विधान त्यांनी केले. यावरून त्यांना या संदर्भात इतिहासाचे ज्ञान नसल्याचे सिद्ध होते. महाराजांनी सुरत का लुटली? हे त्यांनी माहिती करून घ्यावे. सुरत येथील व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला स्वत:च्या सुरक्षेसाठी खंडणी देत होते. त्यांचे कृत्य स्वराज्याच्या विरोधात होते. त्यामुळं त्यांनी सुरतेवर हल्ला केला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांनी हे केले.

राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा वेगळा इतिहास आहे. त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय संबंध आहे हे समजून घ्यावे लागेल. ते इतिहास मोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाजी महाराजांच्या अवमानावर भाजपने बोलावे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केला होता. आता दीपक केसरकर यांनी अवमान केला. या लोकांनी मालवणमधील पुतळ्यातील भ्रष्टाचारावर बोलावे. ज्यांनी हा अवमान केला, त्यांची मानसिकता काय? याचे उत्तर द्यावे.

फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष
राऊत पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. नुकताच हा क्लब अस्तित्वात आला असून, फडणवीस आणि त्यांचे सहकारी या क्लबचे अध्यक्ष व सदस्य आहेत. आम्ही महाराजांच्या सन्मानार्थ आंदोलन केले. त्यांनी हे आंदोलन दडपण्याचे काम केले. यावरून त्यांचा औरंगजेब फॅन क्लब सिद्ध होतो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी औरंगजेबाच्या बाता गुजरातमध्ये जाऊुन कराव्यात, या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आम्ही बांधली आहे, असंही राऊत म्हणाले.

फडणवीस पेशव्याचे उत्तराधिकारी
शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी शिवाजी महाराजांचे साम्राज्य लयास नेले. त्यांनी सर्वप्रथम पुण्यातील शनिवारवाड्यात ब्रिटीश युनियन जॅक फडकावला. फडणवीस हे त्या पेशव्याचे उत्तराधिकारी आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती. तुम्ही मालवणमधील पुतळा तोडला हे तुमचे पाप आहे. त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारे मोकाट फिरत आहेत. तुम्ही त्यांना अटक केली नाही. कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत. फडणवीस हे शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत, अशी जहरी टीका राऊतांनी केली.