उदय सामंत यांच्यावर हल्ला प्रकरणी ६ जणांना पोलिस कोठडी

पुणे, ३ आॅगस्ट २०२२: माजी मंत्री उदय सामंत यांच्यावरील हल्ला प्रकरणात शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात तसेच शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणी आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

 

मंगळवारी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री आणि अन्य आमदार कोंढवा रस्त्यावरून आमदार तानाजी सावंत यांच्या सातारा रस्त्यावरील निवासस्थानी आले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आमदार सामंत यांची मोटार होती. मात्र, ही मोटार ताफ्यात काहीशी मागे राहिली. कात्रज चौकात ही मोटार येताच शिवसैनिकांच्या एका गटाने मोटारीवर हल्ला केला. काहीवेळापूर्वीच कात्रज चौकात आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती.त्यामुळे काही शिवसैनिक अजून त्या ठिकाणी होते.

 

बबन थोरात हे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख आहेत. आमदार सावंत यांच्यावरील हल्ल्यात ते प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात बोलताना त्यांनी शिवसैनिकांना चिथावणक्ष मिळेल, अशी भाषा वापरली होती. बंडखोरांच्या गाड्या फोडा मोतोश्रीवर नेऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते सन्मान करतो, अशा स्वरूपाचे विधान थोरात यांनी केले होते. त्यामुळे थोरात यांनी राज्यातील शिवसैनिकांना दिलेल्या चिथावणीतून पुण्यातला आमदार सामंत यांच्यावरील हल्ल्याचा प्रकार झाल्याचा आरोप ठेऊन थोरात यांनाही अटक करण्यात आली आहे.

 

दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात असलेल्या आमदार सामंत यांच्या मोटारीवर हल्ला झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत रात्रीतून आरोपींना शोधत अटक केली. सकाळी पुणे सत्र न्यायालयात या पाचजणांना हजर केले. न्यायालयाने पाचजणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या हल्ला प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.