शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर लढवायची लोकसभा निवडणूक – जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
मुंबई, ३० मे २०२३: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय युती, आघाडी केलेल्या प्रमुख पक्षांनी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा येतील, याचे आखणी करायला सुरू सुरूवात केली. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या खासदारांबाबात मोठं विधान केले आहे. शिवसेनेच्या या १३ खासदांना धनुष्यबान नाही तर भाजपच्या कळम चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असा गौप्यस्फोट केला आहे. गद्दारीच्या शिक्क्यामुळे मतदारांची नाराजी असल्याने हा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची नाही. शिंदेच्या सोबत असलेल्या बऱ्याच खासदारांना आगामी लोकसभा निवडणुक ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे, असं खळबळजनक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
शिंदे गटाच्या खासदारांना भाजपच्या तिकीटावर खासदारकी लढवायची आहे. त्यामुळं शिंदे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, भाजपच्या तिकिटावर शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक लढवली तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंसोबत परतण्याची शक्यता असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पाटील म्हणाले, ‘‘काल दिल्लाीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांत वाद झाले. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, देशाच्या इतिहासामध्ये जगामध्ये या महिला खेळाडूंनी कुस्तीपटूनी विशेष कामगिरी बजावली, सुवर्णपदक मिळवले. वेगवेगळ्या खेळात पदके मिळालेल्या महिला खेळाडूंना रस्त्यावर खाली पाडून त्यांच्या तोंडावर पोलीस बुटाचे पाय ठेवतात ही निर्घृण आणि अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. त्या महिला खेळाडू इतके दिवस आंदोलन करत आहेत त्यांचे आंदोलन चिरडून टाकणे हा निषेधार्ह प्रकार आहे. देशातील सत्ता ज्यांच्या हातात आहे ते किती असंवेदनशील झाले, याचाचा हा पुरावा आहे.