शरद पवारांचे जवेणाचे निमंत्रण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नाकारले: फडणवीस म्हणाले जेवणासाठी वेळ नाही, नंतर बघू

मुंबई, १ मार्च २०२४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण नाकारले आहे. बारामती येथील कार्यक्रमानंतर दोन मोठे कार्यक्रम आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत व्यस्ततेचा असल्याने यावेळी आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे शक्य होणार नाही, असे शिंदे-फडणवीस यांनी पत्र लिहून शरद पवार यांना कळविले आहे.

राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे या जिल्ह्यातील खासदारांनाही या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना शरद पवार यांनी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले होते.

असे होते शरद पवारांचे पत्र :
शरद पवार यांनी याबाबत शिंदे, फडणवीस यांना एक पत्रही लिहिले होते. “आपण शनिवार, दिनांक 02 मार्च 2024 रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करतो. आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा.
दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्विकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पवार म्हणाल होते.

पवारांच्या उत्तराला फडणवीसांचा पलटवार पवार यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी उलट टपाली उत्तर पाठवले. ते म्हणाले, आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. पुनश्चः एकदा आपले आभार.