दादा भुसे अन् महेंद्र थोरवे भिडले! शिंदे गटाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा

मुंबई, १ मार्च २०२४ : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यावसन एकमेकांना धक्काबुक्की करण्यात झाले. त्यावेळी लगेचच मंत्री शंभुराज देसाई यांनी मध्यस्थी करुन दोघांमध्ये वाद मिटवला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लॉबीत येऊन दोघांची समजूत काढली आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दोघांमध्ये कोणतीही धक्काबुक्की झाली नाही, असा खुलासा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार लोकांच्या कामापेक्षा एकमेकांच्या कामात गुंतले आहेत, त्यातूनच अशा प्रकारच्या घटना विधिमंडळाच्या आवारात घडत आहेत, अशी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकार संताप व्यक्त केला. “सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारामध्ये धक्काबुक्की होणं किंवा हमरी तुमरी होणं हे दुर्देवं आहे. वरिष्ठांना लहान्यांना कसं वागवायचं याची सद्सदविवेक बुद्धी नाही. हे सर्व घडणे हे दुःखद असून, संस्कार आणि अन्य गोष्टी गेल्या अडीच वर्षात धुळीस मिळाल्या आहेत” असे आव्हाड म्हणाले.