पुणे लोकसभेसाठी माझे नाव घ्या; इच्छुकांनी केले पदाधिकार्यांना फोन

पुणे, १ मार्च २०२४ ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असला पाहिजे यावर शहरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेण्यात आले आहेत. ही मते गोपनीय अहवालात बंद झाली असून, त्याद्वारे उमेदवारी जाहीर करता पदाधिकाऱ्यांचे मत निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांच्या समोर आपले नाव घ्यावे यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी फोन केल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर आलेली असताना भाजपमध्ये उमेदवार निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. राज्यातील ४८ पैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत, त्यामध्ये पुणे लोकसभेची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची पक्षाने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी आज (ता. २९) भाजपच्या शहर कार्यालयात दुपारी बारापासून ते सायंकाळी सात पर्यंत माजी आमदार, माजी खासदार, माजी नगरसेवक, प्रदेश स्तरावरील पदाधिकारी, शहरातील पदाधिकारी, आघाड्यांचे अध्यक्ष यांच्यासोबत वैयक्तीक चर्चा करून त्यांच्या मनातील उमेदवार कोण? हे जाणून घेतले आहे.

पुण्यातून निवडणूक लढविण्यासाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, संजय काकडे, सुनील देवधर, शिवाजी मानकर हे इच्छुक आहेत. यातील दोन उमेदवारांनी काल रात्रीपासून माजी नगरसेवक, शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना फोन करून माझे नाव निरीक्षकांसमोर सुचवावे अशी गळ घातली. त्याची पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

बहुतांश पदाधिकारी एक ते दोन मिनिटात त्यांचे मत व्यक्त करून बाहेर येत होते. तर काही पदाधिकाऱ्यांसोबत निरीक्षकांनी सविस्तर चर्चा केली आहे. त्यामध्ये शहरातील सध्याची राजकीय स्थिती, पक्ष संघटन, उमेदवाराचे काम, जनसंपर्क, जातीय समीकरणे, उमेदवार कोणत्या भागातील असावा, काँग्रेसचा संभाव्य उमेदवार कोण असेल त्याचा निवडणुकीवर होणारा परिणाम यावर या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

पक्ष देईल तो उमेदवार
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट नाव न घेता उत्तर दिले. शहरात भाजपसाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे पक्ष ज्या इच्छुकाला उमेदवारी देईल त्याला आम्ही निवडून आणू असे उत्तर दिले आहे. तर काही इच्छुकांनी त्यांचा प्रभाव वापरून पदाधिकाऱ्‍यांना फोन करून त्यांचे नाव सुचविण्यास सांगितले असले तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार निरीक्षक कृपाशंकर सिंह, बाळासाहेब पाटील यांनी आज पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कोण असावा यासंदर्भात आजी माजी खासदार, आमदार,पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. त्याच गोपनीय अहवाल प्रदेश भाजपला सादर करणार आहेत.’’
– धीरज घाटे, शहराध्यक्ष