आरक्षण देताच फडणवीस सदावर्तेला याचिका दाखल करायला लावणार: डिस्चार्ज मिळताच जरांगे आक्रमक

छत्रपती संभाजीपनगर, १ मार्च २०२४: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डिस्चार्ज मिळताच जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले. जरांगे म्हणाले की, फडणवीसांनी आता महिलांना पुढे केले आहे. तसेच ते एका हाताने आरक्षण देणार आणि गुणरत्न सदावर्तेला दुसऱ्या हाताने याचिका दाखल करायला लावणार. असा आरोप देखील यावेळी जरांगे यांनी फडणवीसांवर केला आहे.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, माझी तब्येत आता चांगली आहे. अंतरवाली माझे गाव आहे. त्यामुळे पोलिस मला अंतरवालीमध्ये जाऊ देतील. तसेच देवेंद्र फडणवीस एका हाताने आरक्षण देणार आणि गुणरत्न सदावर्तेला दुसऱ्या हाताने याचिका दाखल करायला लावणार. कारण देवेंद्र फडणवीस हे गुणरत्न सदावर्ते यांचे श्रद्धेय आहेत ते नेहमी त्यांना श्रद्धेय म्हणून संबोधतात.

पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य झाली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगतो की, मराठा समाज मागास सिद्ध ठरला आहे, आम्हाला ओबीसीचा आरक्षण द्या. ओबीसी आरक्षण दहा टक्के वाढ व्हायला हरकत नाही. तसेच यावेळी जरांगे यांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या महिलांवरील वक्तव्यावरील आरोपांना देखईल उत्तर दिले.

जरांगे म्हणाले की, आम्ही महिलांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्यांचे आम्ही समर्थन करत नाही. इतर कोणत्या समाजाच्या तरुणांनी महिलांच्या बाबतीत अवमान होईल असं कुठलेही विधान किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकू नये. महिलांबाबतीत अवमान करणारे वक्तव्य किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकणारे कार्यकर्ते आमचे नाहीत.

भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी संविधानाची आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुम्ही देखील तुमच्या नेत्यांना या संविधानाचा अनुकरण करण्याबाबत सांगा. आंतरवाली सराटी या ठिकाणी महिलांना मारहाण झाली त्यावेळी देखील तुम्ही बोलायला हवे होते.
विशिष्ट पक्षाचा गमछा घालून येणे आणि दबाव टाकणे हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांना पुढे केले आहे.