शरद पवार यांना मिळाली तुतारी
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मुख्य पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव मिळालेले असताना आज रात्री उशिरा निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह जाहीर केले आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये शरद पवारांची तुतारी वाजणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे.
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली अजित पवार यांच्या गटासोबत ४१ आमदार गेले आहेत. तर शरद पवार यांच्या सोबत केवळ १३ आमदार राहिले आहेत. तर प्रत्येकी दोन दोन खासदार या दोन्ही गटाकडे गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी कोणाची यावरून न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तसेच विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे मिळालेले आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव दिले. शरद चंद्र पवार या नावावर अजित पवार गटाने आक्षेप घेतला होता व हे नाव काढून टाकावे अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने अजित पवार गटाला जोरदार फटका देत तुम्हाला सांगण्याचा हा अधिकार नाही असे सांगितले तसेच शरद पवार यांच्या गटाचे नाव कायम ठेवले. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह दिलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची न्यायालय लढाई सुरू असताना त्याचा निकाल लागेपर्यंत हे चिन्ह शरद पवार यांच्या गटाला वापरावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील त्यामुळे आता या चिन्हाला कितपत यश मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.