संजय राऊतांनी पवारांच्या घरातलं वातावरण खराब केलं – नितेश राणे यांचे टीका

मुंबई, ३ मे २०२३ :संजय राऊतसारखा माणूस घरात घेण्याच्या लायकीचा नाही. घरात घेतल्यानंतर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं, भांडणं कशी लावायची यावर याची रोजीरोटी चालते. तेच पवारसाहेबांच्या घरात करताना दिसतोय, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते नितेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शाब्दिक चकमक होत आहे. संजय राऊतांच्या सर्व दाव्यांना खोडून काढण्याकरता नितेश राणे सातत्याने त्यांची भूमिका जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पक्षाच्या अध्यक्षपदावरील निवृत्तीची घोषणा केली. यावरून संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण काढत शरद पवारही राजीनामा मागे घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

नितेश राणे संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, “संजय राऊतसारखा माणूस घरात घेण्याच्या लायकीचा नाही. घरात घेतल्यानंतर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं, भांडणं कशी लावायची यावर याची रोजीरोटी चालते. तेच पवारसाहेबांच्या घरात करताना दिसतोय. पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं, आणि आता अजित दादांच्या विरोधात बोलणं. पवार कुटुंबीयांतील संदर्भात कोणताही विषय असेल महाराष्ट्रातील कोणताही राजकारणी त्यावर बोलत नव्हता. पण एकमेव संजय राऊत होता, त्याने अजितदादांविरोधात भाष्य केलं. याला कोणी अधिकार दिला. याला काय गरज पडली? जे काही पवार कुटुंबीयात करायचं आहे ते आपसात बघून घेतील. आधुनिक शकुनी मामा आहेस का तू?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अजितदादांचा अपमान

“अजितदादांचा अपमान करायचा प्रयत्न केला. बीकेसीला वज्रमुठ सभा झाली. अजित दादा स्टेजवर आले, सर्वांना भेटत पुढे जात होते, पण हा कसा भेटला त्यांना ते पाहा. त्यांच्याकडे बघतही नव्हता. आखडून उभा होता. भाषण करत असताना अजित दादांचे गोडवे गायला लागला. शकुनी मामालाही लाज वाटेल, की हा माझ्यापेक्षा जास्त कपटी आहे. शकुनी मामा बरा होता, असं बोलण्याची वेळ आलेली आहे”, अशा शब्दांत नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.
“मुंबईच्या बीकेसीतील वज्रमुठ सभेत पोडिअमचा वाद झाला. ते मुख्य पोडिअम न देणं हा निर्णयही संजय राऊतांनी घेतला. हेच घाणेरडं राजकारण संजय राऊतांनी केलं. बाळासाहेबांपासून ते पवारसाहेबांपर्यंत त्यांचं काम आणि रोजीरोटी यावरच चालते”, अशी टीकाही त्यांनी राऊतांवर केली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप