कोण अध्यक्ष होणार मला माहिती नाही, साहेबांनी निर्णय मागे घ्यावा एवढीच विनंती – जितेंद्र आव्हाड

मुंबई, ३ मे २०२३: सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का मला माहिती नाही, फक्त पवारांनी राजीनामा मागे घ्यावाया मताचा मी आहे. त्यामुळेच राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (३ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला यातील काहीही माहिती नाही. शरद पवार यांनी मागे घ्यावा याच मताचा मी आहे. बाकी इतर मला काहीही माहिती नाही. याबाबत कोणतीही बैठक झाली नाही किंवा चर्चा झालेली नाही. इतर कुणाच्या बैठका झाल्या असतील तर त्याविषयी मला काही कल्पना नाही. कसली बैठक कुठे होणार आहे हे मला काहीही माहिती नाही.”

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीटद्वारे शरद पवारांना राजीनामा परत घ्यावाच लागेल, अशा शब्दांत अधिकारवाणीने शरद पवार यांना साद घातली होती. जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले होते, “शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे तुम्ही आम्हांला सांगत आले.”

“तुम्ही राजीनामा देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात”
“आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार. तुम्हाला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हाला राजीनामा परत घ्यावाच लागेल,” असं मत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलं.

“संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून तीव्र आंदोलनं सुरू होतील”
“संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून तीव्र आंदोलनं सुरू होतील. लोक शरद पवारांचंही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी राजीनामा मागे घेतला पाहिजे, हीच त्यांची मागणी आहे. मी स्वतः ३५ ते ४० वर्ष राजकारणात आहे, त्यांचं बोट धरून पुढे आलो आहे. ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राहायचंय या राजकारणात. संपलं आमचं पण राजकारण. हीच भावना अनेकांची आहे. शरद पवार हे लोकभावनेचा आदर करणारे, लोकशाही मानणारे नेते आहेत. ते लोकांच्या भावनेचा आदर करतील, ते सकारात्मकपणे विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील,” असंही जितेंद्र आव्हाडांनी नमूद केलं होतं.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप