“शिवसेनेतील असंतोष शमविण्यास नेतृत्व कमी” – ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून उद्धव ठाकरेंवर भाष्य

मुंबई, ३ एप्रिल २०२३ : राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडीची बित्तंबातमी हवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याच क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं. असे अनुभवाचे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख
आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काढले आहेत. ‘लोक माझे
सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत त्यांनी हे अनुभवकथन केले. उद्धव ठाकरे यांचे विश्लेषणही करत शिवसेना फुटीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत शिवसेनेतील असंतोषाचा उद्रेक शमविण्यास नेतृत्व कमी पडल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर बोट
ठेवले.

पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरला झाले. यावेळी पवार यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, ‘लोकसत्ता’चे संपादक
गिरीश कुबेर, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, पत्रकार अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. शरद पवार यांनी यावेळी आपल्या १ मे १९६० पासूनच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला.

महाविकास आघाडीचे जनक असणाऱ्या शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत महाविकास आघाडी’ ची जुळणी यावर स्वतंत्र मांडणी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या
अडीच वर्षांच्या काळाचा ऊहापोह करत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे राजकीय चातुर्य कमी पडत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात. परंतु महाविकास
आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच
टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण
शारीरिक अस्वास्थ्य हेच असावं.’ असंही निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आघाडीच्या सत्तेला विराम मिळाल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

मंत्रालयात दोनदाच जाणं पसंत नव्हतं

उद्धव ठाकरे यांच्या साधेपणाचेही कौतुक पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंच्या शर्ट-पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयाच्या पोशाखात सहजपणानं वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होतं. कोरोना साथ सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे
साधलेला संवाद सहज आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला ते फारच भावलं. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असं या वर्गाला वाटत होतं. मंत्रालयातल्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. मंत्रालयातील वर्ग तीन आणि चारचा कर्मचारी सामान्य मुंबईकर आहे. या वर्गाने उद्धव यांना मनपूर्वक साथ दिली. मात्र त्यांना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं, आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं असंही पवार अखेरीस व्यक्त झाले आहेत.

वडिलकीच्या नात्यानं ‘मातोश्री’वर

बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. ‘महाविकास आघाडी’चं जनकत्व माझ्याकडे होते. त्यामुळे पालकाच्या भूमिकेतूनच मी याकडे पाहत होतो. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव यांच्या प्रकृतीचं वर्तमान समजत असे. मग मी
स्वतच त्यांची विचारपूस करण्यासाठी ‘मातोश्री’वर वडिलकीच्या नात्यानं गेलो होतो. आमच्यापर्यंत आलेले काही विषय उद्धवशी संपर्क करून मी कानांवर घालायचो, काय करायला हवं, याबाबतही सूचना करायचो. त्या सूचनांवर कार्यवाही होत असे, असाही माझा अनुभव असल्याचेही पवार यांनी मान्य केले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप