पुणे: कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

पुणे, ता. १८/०१/२०२३: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि दोन मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या तारखांची आज घोषणा केली. दरम्यान आता या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका बिनविरोध होणार की विरोधकांकडून उमेदवार उभा केला जाणार हे पाहावे लागणार आहे.

कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप या दोघांचे कर्करोगाने निधन झाले. एका मागे एक भाजपचे दोन आमदार निधन पावल्याने पक्षाला एक मोठा धक्का बसला.

आमदारांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पुढचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सध्या सुरू आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून रूपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याचे उलट पडसाद उमटले. आमदारांचे निधन होऊन काही दिवस झालेले असतानाच निवडणुकीची चर्चा सुरू केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याने पोटनिवडणूक वक्तव्य करू नये अशा शब्दात कान टोचत या वादावर पडदा टाकला होता. तसेच टिळक यांच्या शोकसभेमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी व तसेच टिळक कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन ३१ जानेवारी रोजी काढली जाणार असून ७ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी मतदान होऊन २ मार्च रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी टिळक व जगताप कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपने अद्याप भूमिका स्पष्ट केलेले नाही मात्र आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ही निवडणूक आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केल्याने कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी काळात काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.