इडीच्या विरोधात फॅमिली ड्रामा; रोहित पवारांसाठी शरद पवारांची पत्नी मैदानात

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज (१ फेब्रुवारी) पुन्हा ईडी चौकशी होत आहे. गत चौकशीप्रमाणेच यावेळी देखील पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पक्ष कार्यालयात उपस्थित राहत नातू रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचा संदेश राज्याला देत आहेत. मात्र यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बारामती अ‍ॅग्रो कंपनी,कन्नड साखर कारखाना, तसेच खासगी कंपन्यांतील व्यवहारासंदर्भात रोहित पवार मागील काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आले आहेत. याच प्रकरणात गत आठवड्यात त्यांची तब्बल १२ तास ईडी चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत रोहित पवार यांना पाठिंबा दिला.

राष्ट्रवादीचे कार्यालय हे ईडी कार्यालयाच्या जवळच असल्याने गतवेळी रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून होते. त्यातून त्यांनी राज्याला पक्ष तर रोहित पवार यांच्या पाठिशी उभा आहेच, पण आजोबा आणि कुटुंबही पाठिशी आहेत. भाजपच्या दबावाच्या राजकारणापुढे झुकायचे नाही, असा भावनिक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.  त्यानंतर आज पुन्हा एकदा रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

मात्र यावेळी पवार यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबच राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित आहे. यातही प्रतिभा पवार यांची उपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे चित्र पाहुन उपस्थित कार्यकर्त्यांसोबत रोहित पवारही काहीसे भावनिक झाल्याचे दिसून आले. प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीतून रोहित पवार यांना पाठिंबा देण्याचा भावनिक संदेश देण्यासोबत भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांच्यावरही भावनिक दबाव निर्माण करण्याचा एक प्रयत्न असल्याचे बोलले जाते आहे.