भाजपमध्ये या इडीचे अधिकारी तुमच्या घरी झाडू मारतील – मोदी गॅरेंटीची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

रायगड, १ फेब्रुवारी २०२४: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चारशे पारचा नारा दिलाय. यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं राजकारण करते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधांना संपवत आहे. नुकतचं भाजपने नितीश कुमारांना सोबत घेतलं, त्याआधी अजित पवारांनाही सोबत घेतलं. अजित पवारांना ७० हजार कोटींचा आरोप केला आणि दुसऱ्याचं दिवशी ते भाजपसोबत सत्तेत गेले. भ्रष्ट्राचार करा, भाजपात या… भाजपात आल्यावर ईडीचे अधिकारी तुमच्या घरी झाडू मारतील ही मोदींची गॅरंटी आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरे हे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यारव जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. आता सरकार आपल्या दारी, पंतप्रधान आपल्या दारी अशी परिस्थिती आहे. निवडणुका आल्यावर यांना शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे चार वर्ग दिसतात. मात्र, निवडून आल्यावर सुटाबुटातल्या चार मित्रांसाठी हे सरकार काम करतं. आता निवडमुका आल्यानं सुटबुट की सरकारला जोडे झिजवावे लागतात. पर्यटन हा रायगडचा व्यवसायच आहे. आता पंतप्रधान पर्यंटन म्हणून येतील. झोपडीत राहतील, असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, भाजपने नितीश कुमारांना सोबत घेतलं, त्याआधी अजित पवारांनाही सोबत घेतलं. अजित पवारांना 70 हजार कोटींचा आरोप केला आणि दुसऱ्याचं दिवशी ते भाजपसोबत सत्तेत गेले. आता ते हेमंत सोरेन यांच्यापाठीमागे लागले. हे सगळं निवडणुका जिंकण्यासाठी आहे. अबकी बार चारशे पारचा नारा भाजपने दिला. आधी निवडणुका जिंका, मग सोरेन यांना तुरंगात टाका…. विरोधकांना अटक केल्याशिवाय, निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपला ठाऊक आहे. त्यामुळंच अशा कारवाया केल्या जाताहेत. अजित पवारांवर आरोप झाल्यानंतर ते सत्तेत सहभागी होताच त्यांना मंत्रीपद मिळाली. भ्रष्ट्राचार करा, भाजपात या. भाजपता आल्यावर ईडीचे अधिकारी तुमच्या घरी झाडू मारतील ही मोदींची गॅरंटी आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावा. ते म्हणाले, पण सगळेच काही नेभळट आणि लाचार नसतात, असा इशाराही त्यांनीदिला.

हिंदुत्व सोडलं, अशी टीका शिवसेनेवर होते. २०१९ पर्यंत आम्ही हिंदू होतो. मग २०१९ ला मोदी पंतप्रधान झाल्यावर आम्ही धर्मांतर केलं का? जो या देशासाठी मरायला तयार आहे तो हिदू आहे. आम्हाला देवळात घंटा बडणवारा हिंदू नको. अतिरेक्यांशी लढणार हा खरा हिंदू आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे, असंही ठाकरेंना ठणकावलं.

फडणवीस पाव मंत्री
यावेळी त्यांनी फडणवीसांवरही टीका केली. फडणवीस हे आधी फुल होते. नंतर सरकार गेल्यावर विरोधी पक्षनेते झालं. मग फोडाफोडी केल्यावर वाटलं ते पुन्हा फुल होतील. मात्र, अर्धेच मंत्री झाले. अजित दादा सोबत आल्यावर पाव मंत्री झाले, असा टोला त्यांनी लगावला.

अर्थसंकल्प देखील टोप्या घालण्याचा प्रकार
पूर्वी आपल्याकडे जादूचे प्रयोग व्हायचे. आधी आपल्याला दिसायचं की, जादूगार यायचा. रिकामी टोपी दाखवून त्यावर फडकं ठेवायचा. मंत्र म्हणून टोपीत हात घालून कबुतर बाहेर काढायचा. आपण म्हणायचो काय अचाट माणूस आहे. रिकाम्या टोपीतून कबुतर काढून दाखवलं. आता माझं यालाच. त्यावेळी आपल्या लक्षातही आलं नाही की, कबूतर उडून गेलं आणि आपल्याला टोपी घातली गेली. आपचा अर्थसंकल्प देखील टोप्या घालण्याचा प्रकार आहे. आता फुकटात गॅसही देतील आणि निवडणूक झाली की, तिप्पट भाव वाढवतील, त्यामुळं या सरकारला आताच गाडायला हवं, अशी टीका ठाकरेंनी केली