कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन मोदी शहांनी दिला स्वरक्षीयांनाच धक्का
पुणे, १५ फेब्रुवारी २०२४: कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने पुणे भाजपलाच सर्वाधिक धक्का बसला आहे. २०१४ मध्ये विद्यमान आमदार, तसेच सर्वाधिक मत्ताधिक्याने विजयी झाल्यानंतरही भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आमदार कुलकर्णी यांना २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली होती. गेली चार वर्षे आमदार कुलकर्णी यांना शहर भाजपकडून पक्षाच्या कार्यक्रमांमधूनही बाहेर ठेवले होते. मात्र, पक्षाने आधी राष्ट्रीय महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आणि त्यानंतर थेट खासदारकीची संधी दिल्याने शहरातील भाजपची विधानसभा आणि लोकसभेची गोळाबेरीज बदलणार आहे.
त्यातच भाजपने पुण्यात ब्राह्मण चेहरा असलेला उमेदवार देत कसबा विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची भरपाई करण्यासह लोकसभेसाठी मराठा समाजाच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गेली चार वर्षे प्रा. कुलकर्णी यांना बाजूला ठेवणार्या शहर पदाधिकार्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
तिकीट कापल्यानंतर केले दूर
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपने पक्षसंघटनेत सक्रीय असलेले चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रा. कुलकर्णी यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. पक्षाकडून कोणतीही कल्पना न देता दूर सारल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी त्यांना पक्षाच्या शहराच्या कार्यक्रमांतून डावलण्यात आले. या वेळी अनेक पक्षांनी त्यांना तिकीटही देऊ केले. मात्र, त्यांनी वेगळी वाट धरली नाही. चांदणी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमातही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेत त्यांना योग्य वेळी संधी दिली जाईल, असे सूतेवाच केले होते. त्याच वेळेत त्यांच्याकडे भाजपने महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी संघटनेच्या कामात वेळ देत केंद्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले. तरीही पक्षाच्या शहर कार्यक्रमात त्या फारशा दिसत नव्हत्या. त्यामुळे शहरात त्यांना साईट ट्रॅक केल्याची चर्चा होती, तसेच पुन्हा २०२४ मध्ये विधानसभेवर संधी नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, पक्षाने त्यांना थेट राज्यसभेची संधी देत अनेकांना धक्के दिले आहेत.
भाजपने सोडविले जातीय गणित
खासदार गिरीश बापट यांचे मागच्या वर्षी निधन झाले; परंतु साधारण वर्षभराचा कालावधी शिल्लक असतानाही पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक झालेली नाही. त्याच्या काही महिने आधीच पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली होती. कसब्यातील जागेवर भाजपने ब्राह्मण उमेदवारास प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, पक्षाकडून रासने यांना संधी देण्यात आली, तर पुन्हा एकदा लोकसभेचा ब्राह्मण उमेदवार असावा, अशीच मागणी होती. जगदिश मुळीक, मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर हे सुद्धा लोकसभेसाठी तयारीत आहेत. त्यामुळे भाजपने आता राज्यसभेवर ब्राह्मण उमेदवार देत लोकसभेसाठी मराठा उमेदवाराला संधी देण्याचे जातीय गणित सोडविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.