राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज उतरणार रस्त्यावर; मराठ्यांना ओबीसी घेण्यात विरोध

मुंबई, २९ जानेवारी २०२४ : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशांना सगेसोयरे या शब्दाखाली आता ओबीसी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा अडथळा दूर झाला असे वाटत असले तरी आता मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या निर्णयास विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहेत. तसेच एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी समाजातील अन्य महत्वाचे पदाधिकारी संघटना आमदार यांची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये आंदोलनाची पुढील रूपरेषा निश्चित करण्यात आले असून १६ फेब्रुवारी पर्यंत जास्तीत जास्त हरकती यासंदर्भात नोंदवण्याचे सूचनाही करण्यात आलेली आहे.
या संदर्भात छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट करत ओबीसी समाजाला आंदोलनासाठी साद घातली आहे.

“तमाम ओबीसी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी गट तट सोडून सर्व ३७४ जातींनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे.
१ फेब्रुवारी २०२४ रोजी आपापल्या भागातील आमदार, खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात. लाखोंच्या संख्येने बाहेर पडून ही मागणी सर्वांनी मांडावी. सर्व आमदार खासदारांना ओबीसी, भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना त्यांचीही गरज आहे, याची जाणीव करून द्यावी.

तसेच या मसुद्यासंदर्भात दि. १६ फेब्रुवारीपर्यंत लाखोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात येणार आहेत.
३ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसींचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या मेळाव्याला सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
ओबीसी, भटके विमुक्त समाजात अनेक विचारवंत, लेखक, वक्ते, वकील आहेत. या सर्वांनी आपापल्या परीने या कामामध्ये आम्हाला सहकार्य करावे. वकील बांधवांनी ओबीसींवरील होणारा अन्याय न्यायालयात पटवून दिला पाहिजे.
लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार आहे. त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.
ओबीसी, भटके विमुक्त यांच्याबरोबरच एससी, एसटी आणि इतर सर्व समाजाने देखील या झुंडशाहीच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र येऊन आमच्या आंदोलनाला साथ द्यावी, असे माझे आवाहन आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले आहे.