मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुट्टीला विघ्न; हेलिकॉप्टर झाले खराब

मुंबई, १० ऑगस्ट २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज साताऱ्यातील मूळ गावी दरे इथं जात होते. त्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने राजभवनातून उड्डाण केलं होतं, मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या जुहूमधील पवन हंस हाऊस इथं हेलिकॉप्टर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

साताऱ्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी दरे या गावी जाणार आहेत. मुख्यमंत्री काही दिवस दरे गावात मुक्काम करणार आहेत.

या भागातील काही गावातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वत: बांबू लागवड करणार असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, मे महिन्यातही मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा दौरा केला होता. त्यावेळीही मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यात असा अडथळा आला होता. त्यावेळीही सातारा दौऱ्यात जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आलं होतं. आताही पुन्हा एकदा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.