पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची कुरघोडी

पुणे, ८ ऑगस्ट २०२३: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असताना आज उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पुन्हा सक्रीय झाले. महापालिका, जिल्हा प्रशासन व पीएमआरडीएच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच “पुण्यासाठी शासनाकडून आवश्‍यक ती मदत दिली जाईल,’ असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होणार अशी चर्चा सुरू असताना आज पवारांनी पाटील यांच्यावर कुरघोडी केल्याचे स्पष्ट झाले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ऑनलाइन प्रणालीद्वारे ही बैठक झाली. महापालिका आयुक्तांसह, जिल्हा प्रशासन तसेच पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पवार यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचाही आढावा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या बैठकीत पवार यांनी महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रोचा आढावा घेतला. विशेषत: पुणे मेट्रोची उर्वरीत कामे वेळेत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, विस्तारीत मार्गांबाबत राज्यशासनाकडून लवकरात लवकर आश्‍वासन पवार यांनी यावेळी दिले. पीएमआरडीएचा शिवाजीनगर ते हडपसर हा विस्तारीत मेट्रो मार्ग करण्यासाठी महामेट्रो तसेच पीएमआरडीए दोन्ही यंत्रणा तयार आहेत. याचे काम कोणी करायचे यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, त्यावर तोडगा निघत नसल्याने याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनास सांगण्यात आले. याशिवाय, पुणे विद्यापीठ चौक, चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेत पुणे- नाशिक रेल्वेच्या भूसंपादनासह, रिंगरोड प्रकल्पाच्या कामांचाही आढावा पवारांनी घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड करत अजित पवार यांनी महायुतीमध्ये शिंदे फडणवीस सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अजित पवार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद असते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनीच पुण्याचा कारभार हातात घेतला होता. त्यामुळे आता देखील चंद्रकांत पाटील यांच्या अजित पवार यांच्याकडेच पुण्याचे पालकमंत्री जाहीर अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय अद्याप सरकारने घेतलेला नसला तरी अजित पवारांनी पुण्यात जिल्ह्यातील व शहरातील विकास कामांमध्ये हस्तक्षेप परत कामांचा आढावा सुरू केला आहे. त्यामुळे आयत्या काळात चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा सप्त संघर्ष दिसण्याची शक्यत आहे.