महारेराच्या 9 वॉरंटसपोटी मुंबई शहर , मुंबई उपनगर आणि पुण्यातील अशा 5 विकासकांकडून 8 कोटी 73 लाखांची वसुली
मुंबई, दिनांक 13 जुलै 2023: महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे . महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती( Properties) जप्त करून लिलावांच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. आपली मिळकत जप्त होऊ नये यासाठी आणखी काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसान भरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत.
या पद्धतीने 9 वारंटसपोटी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे या भागांतील 5 विकासकांनी 8 कोटी 72 लाख 71 हजार रूपयांची नुकसान भरपाई अदा केलेली आहे. यापूर्वी 11 विकासकांनी 20 वारंटसपोटी 8.57 कोटी रूपयांच्या
नुकसान भरपाईची देणीही अशीच कुठल्याही लिलावाशिवाय अदा केलेली आहे.
महारेराने आतापर्यंत 623.30 कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी 1015 वारंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत 180 वारंटसपोटी 131.32 कोटींची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कमही वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे.
ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई शहरातील समृद्धी डेव्हलपर्स आणि वंडरव्हॅल्यू रिऍलिटी प्रा. लि. या 2 विकासकांचा समावेश आहे. या विकासकांनी 6.46 कोटी रूपयांची
भरपाई दिली असून यातील वंडरव्हॅल्यू विकासकाने एका ग्राहकाला तब्बल 6 कोटी 26 लाखाची भरपाई दिली आहे.
मुंबई उपनगरातही रिलायन्स एंटरप्रायझेस आणि रूची प्रिया डेव्हलपर्स प्रा. लि. या 2 विकासकांनी 1 कोटी 84 लाख 46 हजार रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे. यात रिलायन्सने एका ग्राहकाला नुकसान भरपाईपोटी दिलेली रक्कम 1 कोटी 78 लाख एवढी आहे.
पुण्यातील दरोडे जोग होम्स प्रा.लि. यांनीही त्यांच्या एका ग्राहकाला 42 लाख 25 हजार रूपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे. या रकमेचा धनादेश तहसीलदार श्रीमती राधिका हावळ बारटक्के यांनी संबंधित लाभार्थ्यांना दिला.
महारेराने वेळोवेळी सुनावणी घेऊन व्याज/ नुकसान भरपाई/परतावा देण्याबाबत दिलेल्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. तसेच ही विशिष्ट संनियंत्रण यंत्रणा अधिकाधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी महारेरा कटिबद्ध आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप