ठाकरे तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच ठाकरेंवर पलटवर

मुंबई, ११ मे २०२३: आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलंय. त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा काय पर्याय होता? आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. खरंतर नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. तर “आज मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली. नॉर्मली मी बघत नाही पण आज मी पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये ते असं म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे की भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? याचं उत्तर द्या. खरं म्हणजे नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये. कारण तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडलात आणि एकनाथ शिंदेंनी विचारांकरता खुर्ची सोडली. एकनाथ शिंदे सत्तेत होते ते विरोधी पक्षासोबत आले. त्यामुळे नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फटकराले.

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या वर आहेत. आता ते कुणाला व्हीप बजावू शकतात? शिवसेना म्हणून ते व्हीप बजावू शकतात का? शिवसेना आम्ही आहोत. व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसं किती आहेत? हाही एक प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने बहुमताचा आदर केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष कायद्याला धरून याबाबत निर्णय घेतील. सरकारला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे उत्तर मिळालं आहे. राज्यपाल काय, सगळ्यांनाच माहिती होतं की त्यावेळचं सरकार अल्पमतात आलं होतं. आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलंय. त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा काय पर्याय होता? आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. खरंतर नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित निकाल दिला. अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयांच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली, असे शिंदे म्हणाले.

“उद्धवजी तुमच्या लक्षात आलं होतं की तुमच्याकडे संख्याबळ नाही. तुम्ही हरणार आहात. लोकं तुम्हाला सोडून गेले आहेत. त्या लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिलात. विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करु नका. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे. ” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप