“पवारांमुळे माझे कुटूंब सुरक्षीत” – सुषमा अंधारे अश्रू झाले अनावर

सातारा, ९ मे २०२३ : शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसढसा रडल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचंही नमूद केलं.
मंगळवारी (९ मे) सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “मी सभागृहात सांगू शकणार नाही की शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केलं आणि काय नाही. शरद पवारांमुळे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसतं आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले. मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि शरद पवारांपर्यंत माहिती पोहचवली. माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात मी दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते.”

अंधारे म्हणाल्या, “इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता.”

माझं चुकत असेल तर तुम्ही कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी तुमच्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर मी जे पत्र लिहिलं होतं तेच मी वाचणार आहे. संजय राऊतांनी या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचं मला सांगितलं गेलं. मात्र, हे पत्र मी पुन्हा एकदा वाचून दाखवलं पाहिजे. मला शरद पवार यांचा राजीनामा नको होतो, म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं,” असं मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केलं.
“खरंतर मी शरद पवार यांना लिहावं किंवा सांगावं एवढी प्रज्ञा माझी निश्चितच नाही. मात्र, केवळ पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील बहुजन, उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज जाण असणाऱ्या कुणालाही पवारांचा राजीनामा मानवणार नाही,” असंही अंधारेंनी नमूद केलं.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप