पालखी मार्गाचे जानेवारीत उद्घाटन – गडकरी
पुणे, ११ मार्च २०२३ ः देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होईल. हा पालखी मार्ग खरा भक्तिमार्ग ठरेल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देहू ते पंढरपूर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३० किलोमीटर आणि आळंदी ते पंढरपूर या २३४ किलोमीटरच्या संत ज्ञानेश्वर महामार्गाचे काम हाती घेण्यात आहे. त्याची हवाई पाहणी आज नितीन गडकरी यांनी केली. यावेळी खासदार रणजितसिंह नाइक निंबाळकर, मुख्य महाप्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, उप महाप्रबंधक सचिन गौतम आदी यावेळी उपस्थित होते. हवाई पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
गडकरी म्हणाले, ‘‘पालखी मार्ग हा आस्थेचा विषय आहे. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात, त्यातील अनेकजण अनवाणी चालत असतात. त्यामुळे महामार्ग विकसित करताना पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठीही स्वतंत्र मार्ग असणार आहे. या मार्गावर पायाला चटके बसू नयेत यासाठीही हिरवळ केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०२१ मध्ये भूमिपूजन झाले होते. त्यानंतर दोन्ही महामार्गांचे काम वेगात सुरू आहे.
संत ज्ञानेश्वर महामार्गाच्या कामाचे सहा टप्पे असून, एकूण खर्च ८ हजार कोटी रुपये आहे. यामध्ये मोहोळ ते वाखरीचे ९१ टक्के, वाखरी ते खुडुस ९७ टक्के, खुडुस ते धर्मपुरी ९० टक्के, धर्मपुरी ते लोणंद ४८ टक्के, लोणंद ते दिवेघाट २० टक्के आणि दिवेघाट ते हडपसर या मार्गाची भूसंपादन व निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे काम करताना गावांमधून महामार्ग गेल्यास अनेकांची घरे गेली असती, पण अनेक ठिकाणी बाह्यवळण, भूयारीमार्ग केल्याने गावांना फायदा होणार आहे.
संत तुकाराम महाराज महामार्गाचे तीन टप्पे असून यासाठी ५ हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यामध्ये पाटस ते बारामती ८५ टक्के, बारामती ते इंदापूर ४४ टक्के, इंदापूर ते तोंडल ४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यात या महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण करून, उर्वरित काम डिसेंबरपूर्वी पूर्ण करून जानेवारी महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाईल.
दरम्यान, दोन्ही महामार्गावर रस्त्याच्या कडेने एनएचआयएतर्फे हॉटेल, पेट्रोल पंप, गॅस स्टेशन, स्वच्छता गृहे यासह इतर सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पण या दोन्ही पालखीमार्गावर एकूण २३ पालखी स्थळ आहेत. या गावांमध्ये मोठे सभागृह बांधून वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी, इतर सुविधा द्याव्यात यासाठी महाविकास आघाडी सरकार असताना सह्याद्री बंगल्यावर एक बैठक घेतली होती, त्यास सरकार तयारही होते. आता राज्यात नवीन मुख्यमंत्री आले आहेत, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप