‘पंचामृत’ ध्येयाचा पहिला फटका होर्डिंग धारकांना! – बजेट ची जाहिरात करणे बंधनकारक

पुणे, ११ मार्च २०२३ : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. असे त्याचे वर्णन केले जात आहे. दरम्यान या पंचामृत चा फटका मात्र होर्डिंग धारकांना बसणार आहे. कारण सरकारने सादर केलेल्या बजेट ची माहिती लोकांना देण्यासाठी त्याचे बॅनर लावणे होर्डिंग धारकांना बंधनकारक केले आहे. मात्र याला पुण्यातून विरोध होतो आहे. होर्डिंग असोसिएशन ने याला कडाडून विरोध केला आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट च्या माध्यमातून खूप योजना दिल्या आहेत. यातून शेतकरी, महिला, शहरी वर्ग, बारा बलुतेदार, अलुतेदार अशा सर्वांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे, असे त्याचे वर्णन केले आहे. त्यानुसार आता याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी राज्यातील महापालिकांना कामाला लावण्यात आले आहे. या बजेटची जाहिरात करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षकांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार परवाना निरीक्षक आपल्या हद्दीतील होर्डिंग धारकांना तात्काळ बजेट चे 40 फूट बाय 20 फूट चे फ्लेक्स लावण्याचे आदेश देत आहेत.

मात्र यामुळे होर्डिंग धारक हवालदिल झाले आहेत. अशी जाहिरात करण्याला त्यांनी सक्त विरोध केला आहे. महापालिकेने आधी आमचे प्रश्न सोडवावेत त्यानंतर आम्ही महापालिकेला मदत करू, अशी भूमिका होर्डिंग धारकांनी घेतली आहे