सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे शेतकरी अडचणीत – खासदार सुप्रिया‌ सुळे यांची टीका

पुणे, १० मार्च २०२३ : अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना राज्यकर्ते आणि सरकारी यंत्रणा होळी खेळण्यात व्यस्त होते. थोडा वेळ होळी खेळून कामाला लागले असते तर शेतकऱ्यांच्या‌ नुकसाणीचे पंचनामे रखडले नसते. सरकार असंवेदनशिल आहे, त्यामुळे आज शेकरी अडचणीत सापडला आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती मतदार संघातील परंतु महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रश्नांवर खासदार सुळे यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच राज्यातील ३६ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे यांनी सरकार असंवेदनशिल असल्याचा आरोप केला.

राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना सुळे म्हणाल्या, राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा खूप करण्यात आलेल्या आहेत. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? या घोषणा प्रत्येक्षात येणार आहेत का ? याचाही विचार करणे गरजेचे आहे. महिला आणि मुलींसाठी केलेल्या घोषणा आणि योजना स्वगतार्ह आहे. महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत चांगली आहे, मात्र बसच्या कर्मचाऱ्यांना वेळच्यावेळी पगार मिळतो‌ का? एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कशी आहे ? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तत्वाला तिलांजली देण्याचे‌ काम योजनेला ‘नमो’ नाव देवून करण्यात आल्याचीही टीका सुळे यांनी केली.

गेल्या‌सहा महिन्यात राज्याच्या गृह मंत्रालयाची कामगिरी सुमार पद्धतीची असून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, अघोरी कृत्यांचे प्रमाण वाढले आहे. ईडी, सीबीआयचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. विरोधी पक्षातील नेते पक्षांतर व प्रलोभणांना बळी पडले नाहीत तर त्यांच्या मागे तपास‌ यंत्रणा लावल्या जात आहेत. भाजप सत्तेच्या काळात ९५ टक्क्यापेक्षा अधीक धाडी विरोधी पक्षांच्या नेत्यावर पडल्या आहेत, असेही सुळे म्हणाल्या.
देशात आजवर कधीही कुणी शेतकऱ्याला जात विचारली नाही. मात्र शेतकऱ्यांना खते देण्यासाठी जात विचारली जात आहे. केंद्र सरकारची ही कृती जातीयवादाचा प्रसार व प्रचार करणारी आहे. केंद्र सरकारने हे त्वरीत थांबवावे, आपण याबाबत संसदेतही आवाज उठवणार असल्याचे खासदाक सुळे‌ यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठेकेदारासाठी कर्ज काढण्यास विरोध

महापालिकेच्या वतीने वारजे येथे दोन एकर जागेवर 350 बेड्स चे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या या हॉस्पिटलसाठी मागविण्यात आलेली 360 कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीने मंजूर केली आहे. यासाठी महापालिका  ठेकेदारासाठी स्वतःच्या नावावर कर्ज काढणार आहे. यावर बोलताना सुळे यांनी ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप