चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

पुणे, 12 फेब्रुवारी 2023: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायकांना आज निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण सत्रात महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाचे एकूण ३ टप्पे होणार असून आज पहिला टप्पा पार पडला. सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थीना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, माध्यम कक्षाचे समन्वयक अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे आदी उपस्थित होते.

दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, विविध शासन निर्णय, मतदान यंत्रांची हाताळणी आणि जोडणी कशा पद्धतीने करावी, मतदान यंत्राबाबत तांत्रिक माहिती, मतदान साहित्याची ओळख, मतदान प्रक्रियेवेळी घ्यावयाची काळजी, निवडणूक प्रक्रियेसंबंधी असलेली नियमावली, निवडणूकीची कार्यपद्धती आणि कार्यप्रणाली, विविध नमुन्यांमध्ये भरावयाची माहिती, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे कर्तव्ये आणि जवाबदारी आदींबाबत या प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली. तसेच मतदान यंत्र हाताळण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. प्रशिक्षणार्थीच्या शंकांचे निरसनदेखील यावेळी करण्यात आले.

श्री. ढोले यांनी या प्रशिक्षणात निवडणूक कर्मचाऱ्यांना कामकाजाविषयी सूचना दिल्या. नियमांचे पालन करुन सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडावी, मतदानकेंद्र निहाय नेमण्यात आलेल्या पथकाने ईव्हीएम यंत्र हाताळणी व्यवस्थित करावी आणि विविध नमुन्यातील माहिती वेळेत आणि योग्य पद्धतीने भरावी असे त्यांनी सांगितले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप