कर्नाटक सीमा प्रश्नावर शिंदे फडणवीस गप्प का ? अजित पवारांचा संतप्त सवाल
नागपूर, २३ डिसेंबर २०२२ :’सीमेलगतची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही.सीमा भागाबाबत महाराष्ट्रातला कोणता मंत्री बोलला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा ठराव गुरुवारी कर्नाटक विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सीमा वादावर दोन्ही राज्यांना शांत राहण्याचा दिलेला सल्ला कर्नाटकने धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकने केलेल्या या ठरावावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. अजित पवार हे विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.
“हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कामकाज बैठकीत सीमावादाबाबत ठराव करण्याचे सांगितले होते. या ठरावामुळे सीमेलगतच्या मराठी माणसांनी महाराष्ट्र त्यांच्या पाठिंशी उभा असल्याचा संदेश गेला असता, पण अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे, पण या विषयावर अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का?,”असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
सीमावादाबाबत शिंदे-फडणवीस सरकार भूमिका घेत नाही,असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन करण्यात आले. त्याचे पडसाद आज उमटण्याचे शक्यता आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले, “आजही आम्ही सभात्याग करणार आहोत. सभागृहात जायचे की नाही, याबाबत बैठकीत आम्ही निर्णय घेणार आहोत,”दिशा सॅलियन हे प्रकरण काढायची गरज नव्हती, महागाई, बेरोजगारी असे महत्वाचे प्रश्न आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. सत्ताधारी व्यक्तीच्या चौकशा बंद केल्या जात आहे तर दुसरीकडे विरोधकाच्या जुने केसेस पुन्हा चौकशी करण्याची मागणी होत आहे. जे हयात नाही त्यांच्याबाबत बोलणं थांबण पाहिजे. शिळ्याकढीला ऊत आणण्यायची काम सध्या सुरु आहे,” असे अजित पवार म्हणाले. याबाबत गटनेत्यांची १० वाजता बैठक होणार आहे.
दिशा सॅलियन प्रकरणावर चर्चा सुरू असताना विधानसभेत गुरुवारी गोंधळ झाला. गोंधळात सत्ताधारी पक्षातील आमदार व्हेलमध्ये जमा झाले. तेव्हा जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले असा आरोप करण्यात येतोय. निर्लज्ज शब्द असंसदीय शब्द असल्याने या शब्दावरून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाने काल सभात्याग केला. त्यानुसार, आजही विरोधक सभात्याग करतील का असा प्रश्न विचारला जात आहे.
“मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे,” असे गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. यावरूनही गदारोळ झाला होता. यावरूनच अजित पवारांनी सोयीचं राजकारण सुरू असल्याची टीका केली. मला सभागृहात बोलायची संधी दिली तर मी सर्व दाखवणार आहे. याआधीही अनेकजणांनी मुंबईला असंच संबोधलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचाही समावेश असल्याचं ते म्हणाले.