“सत्तेचा दुरुपयोग करत एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग समजेल” नारायण राणे यांची टीका

दिल्ली, २२ डिसेंबर २०२२: खासदार राहुल शेवाळे लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका करत अरे, सत्तेचा दुरुपयोग करून एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल केला.
पत्रकारपरिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले, “आदित्य ठाकरे जे सांगत आहेत, की माझा काही संबध नाही. ३२ वर्षांच्या तरुण सगळ्यांना पुरून उरला. “मोर्चाच्या दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले, की छाताडावर नाचू आम्ही. ग्रामपंचायत निवडणुकीचा माझ्याकडे निकाल आहे. ७ हजार ६८२ पैकी शिवसेनेला ७२६ क्रमांक पाचवा, सगळ्यात शेवटचा आहे. जरा आत्मपरीक्षण करावं, काय अवस्था झाली आहे. स्वत:च्या छाताडाचा विचार करा. नाचायचा काय विचार करताय, कुठे आलात तुम्ही?, काय करून ठेवलंत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं. बाळासाहेब ठाकरेंनी मिळवलं आणि यांनी गमावलं. भाजपा क्रमांक एक वर आहे. २ हजार ४८२, शिंदे गटाचे ८४२ आणि अपक्ष व इतर आहेत १३६२ हे परत भेटणार. निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाने जिंकल्या आहेत. कुठे आहेत उद्धव ठाकरे?” असंही राणे यावेळी म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका करतांना नारायण राणेंनी म्हटलं की, “संजय राऊतांचं अभिनंदन करायला पाहिजे, त्यांनी जी शरद पवारांकडून सुपारी घेतली, शिवसेना संपवण्याची त्या दिशेने वाटचाल आहे. संजय राऊतांनी जवळपास शिवसेनेला संपवलेलं आहे. म्हणून संजय राऊत आज जे काय बोलतात, फक्त इकडचा विषय तिकडे न्यायचा, शेवाळेंचा विषय काढला. पण शेवाळेंनी जी माहिती सांगितली, एकनाथ शिंदे जी माहिती सांगतात, जो भ्रष्टाचार सांगतात त्याबद्दल बोला. करोना काळात औषध खरेदीत जो भ्रष्टाचार झाला, आतापर्यंत जे जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ठाकरे कुटुंबावर, मातोश्रीवर त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. उद्धव ठाकरेही बोलत नाही आणि आदित्यही बोलत नाहीत. केवळ मीडियासमोर काहीही बडबड केली जाते.”

याचबरोबर, “आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या केसमध्ये माझ्यामते आरोपी आहेत आणि त्यांना वाचवण्याचा आतापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केला गेला. त्यांनी अनेक भ्रष्टाचारही पचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता सगळे बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीत झोप उडालेली आहे.” असंही नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.