नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून; सीमावादासह ‘या’ मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता
नागपूर, १९ डिसेंबर २०२२:
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. करोना काळानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. राज्यपालांसह भाजपा नेत्यांनी महापुरुषांबाबत केली वादग्रस्त विधाने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी, राज्यातून गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीदेखील सज्ज आहेत.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न
मागील काही दिवसांपासून महापुरुषांबाबत झालेल्या विधानांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, याचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता आहे. याबरोबर मंत्र्यांकडून झालेली आक्षेपार्ह विधाने, अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेला हल्ला, राज्यातून गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्द्यांवरूनही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीदेखील सज्ज आहेत. विरोधकांच्या आरोपांना आकडेवारीसह अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे हे अधिवेशन तापण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची अजित पवार म्हणाले होते. “आम्हाला चहापणाला उपस्थित रहा, असं सांगितलं, मात्र सहा महिने सरकारं सत्तेवर आलं आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत”, अशी टीकाही अजित पवार यांनी केली होती.
नागपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक व्यस्थेतही अनेक बदल करण्यात आले आहे. विधानभवन परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयातून पासेस घ्याव्यात, वॉकर स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पोलीस जिमखानाजवळील पुलाजवळून पुढे सीपी क्लब या मार्गावर उभी करावी, विधानभवन परिसरात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यानी ओळखपत्र सोबत बाळगावे, अशा सुचनादेखील पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.