कर्नाटकची मुस्कटदाबी, खासदार धैर्यशिल माने यांच्यावर प्रवेशबंदी
बेळगाव,१९ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशिल माने यांच्यावर परत एकदा बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईसह खासदार माने यांच्यावर प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता परत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज (ता.१९) येथे महामेळावा आयोजिला आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी माने येणार होते. मात्र, त्यांच्यावर प्रवेश बंदीचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजाविले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी व्हॅक्सीन डेपो येथे महामेळावा आयोजिला आहे. मेळाव्याला कोल्हापूरचे खासदार व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात टिळकवाडीमध्ये व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा आयोजिला आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष माने यांना आमंत्रित केले आहे. त्यानुसार उद्या बेळगावला येण्याबाबत माने यांनी कळविले असून, कर्नाटक सरकारला दौऱ्याची अधिकृत माहिती कळविले आहे. मात्र करनाट सरकारने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याशी शक्यता असल्याचे कारण देत प्रवेशबंदी जारी केली आहे. सीमाप्रश्नावरून बेळगावात अलीकडे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दाखला, महाराष्ट्रात कर्नाटक बसेसना फासलेले काळे, दौऱ्यामुळे संभाव्य बेळगावातील भाषिक सौहार्दतेला धोका पोचण्याची भिती व कन्नड-मराठी भाषकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने खा. माने यांना बेळगावात प्रवेशबंदी जारी केल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कर्नाटकातर्फे निर्बंधचा पायंडा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारतर्फे अलिकडे सीमासमन्वय मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील, शंभूराजे देसाई यांची निवड केली आहे. या मंत्र्यांसह खासदार धैर्यशिल माने ६ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र, दौऱ्याला आक्षेप घेत प्रवेशबंदीचे आदेश बजावले. याची धूळ खाली बसते न बसते तेच येथे होणाऱ्या महामेळाव्याला येणाऱ्या खासदार माने यांची अडवणूक केली जात आहे. प्रवेश बंदी संदर्भात आदेश जारी बजाविला आहे.