नारायण राणे यांना उपरती, स्वतःचा बंगला स्वतःच पाडण्याची नामुष्की

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२२ः हम करे सो कायदा या प्रमाणे कायद्याला न जुमानता बेकायदा बांधकाम करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली आहे. न्यायालयाने बंगला पाडण्याचे आदेश दिल्यानंतर स्वतःच बंगला पाडून टाकण्यास सुरवात केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्यास अखेर सुरुवात झाली आहे. राणे कुटुंबाकडूनच जुहू येथील आपल्या बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडलं जात आहे. नितेश राणे यांनी ही माहिती दिली. कोर्टाने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर राणे कुटुंबाकडूनच हातोडा चालवला जात आहे. न्यायालयाने राणेंना ‘अधीश’मधील बांधकाम स्वत:हून हटवावे अथवा मुंबई महानगरपालिकेने पाडकाम केल्यास त्याचे पैसे वसूल करण्याचा इशारा नोटीसमध्ये दिला होता.

नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या आठ मजली ‘अधीश’ बंगल्यात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल केल्याची, अतिरिक्त बांधकाम केल्याची, तसंच सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी २१ फेब्रुवारी रोजी ‘अधीश’ बंगल्याची पाहणी केली होती. पाहणीदरम्यान ‘अधीश’मध्ये अंतर्गत फेरबदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर इमारतीचा आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकामाची पडताळणी करण्यात आली व बांधकाम अनधिकृत आहे यावर शिक्कामोर्तब झालं.