जाणार होते किर्तीकरांचा निषेध करायला पण गेले पोलिस ठाण्यात, संजय निरुपम संतप्त
मुंबई , १६ नोव्हेंबर २०२२: उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. कीर्तीकरांनी शिंदे गटात सहभागी होऊन उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या नागरिकांचा अपमान केलाय. त्यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय निरुपम यांची आहे. याच मागणीसाठी ते आज मुंबईत बाईक रॅली काढणार होते. पण त्याआधीच त्यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काही तासांनी त्यांना सोडण्यात आलं. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बाईक रॅली निघणारच, अशी भूमिका मांडली.
“पोलिसांना पुढे करुन मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देणं चुकीचं आहे. एसीपींनी माझ्यासोबत जी वागणूक दिलीय ती चुकीची आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सस्पेंडज करा”, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दबालाखाली मला ताब्यात घेण्यात आलं”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.
“बाईक रॅली काढतो तेव्हा आम्ही पोलिसांना माहिती देतो. पोलीस परवानगी देतात. त्यांनी परवानगी नाही दिली, बाईक रॅली सुरु झाली नाही, मग तरीही तुम्ही माझ्या घरी कशाला आलात? बाईक रॅली सुरु होईल तेव्हा तुम्ही मला अटक करा. जोपर्यंत बाईक रॅली सुरु होत नाही तोपर्यंत तुम्ही कसं ताब्यात घेऊ शकता? मी बाईक रॅलीसाठी निघतो तेव्हा तुम्ही अटक करा”, असं संजय निरुपम म्हणाले.
“बाईक रॅलीला परवानगी देण्याची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही परवानगी का देत नाहीत? बाईक रॅली होणारच. आतापर्यंत आम्ही परवानगी घेऊन बाईक रॅली काढत होतो, पण आता परवानगी न काढता बाईक रॅली काढू”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“बाईक रॅलीत सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलं. पण काही हरकत नाही. कुठे जाणार? आम्ही बाईक रॅली जरुर काढू. जोपर्यंत गजानन कीर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही बाईक रॅली काढण्यावर ठाम राहणार”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.