पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेट

पुणे, 14 नोव्हेंबर 2022: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज बालेवाडी येथील आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेट दिली. आर. के. लक्ष्मण यांच्या समृद्ध कलेचा हा ठेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, आर. के. लक्ष्मण यांचे सुपुत्र श्रीनिवास लक्ष्मण, स्नुषा उषा लक्ष्मण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वत: तिकीट घेऊन संग्रहालयाला भेट दिली.

संग्रहालय उत्तम पर्यटनस्थळ व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे नमूद करून यावेळी श्री. पाटील म्हणाले, आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांद्वारे कलेसोबत आशय स्पष्ट व्हायचा. वाचक केवळ त्यांची व्यंगचित्रे पाहण्यासाठी वृत्तपत्र घेत असत. त्यांच्या व्यंगचित्रांना, त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांना एकाच ठिकाणी पाहता यावे अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यानुसार ही सर्व व्यंगचित्रे सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी बघता यावी यासाठी संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे.

बाल दिनानिमित्त आज विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संग्रहालयाला भेट द्यावी, तसेच येथे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करावी, असे आवाहन त्यांनी केले.