राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांना बघताच मारली मिठी

हिंगोली, १२ नोव्हेंबर २०२२ : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर) सहभाग घेतला.‌ या यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताच शिवसैनिकांनी राहुल यांच्या यात्रेचे जोरदार स्वागत केले. हे दोन्ही नेते समोरासमोर येताच एकमेकांना मिठी मारून हम एक है असा संदेश दिला .

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी होणार हे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. यामुळे अनेकांच्या नजरा राहुल आणि आदित्य भेटीकडे लागल्या होत्या.

आज सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास यात्रा सुरू होण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा ताफा राहुल यांच्या कॅम्पमध्ये येऊन पोहचला. यावेळी आदित्य यांच्या सोबत शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते.

यावेळी आदित्य ठाकरे येताच राहुल गांधींनी उभे राहत आदित्य यांना कडाडून मिठी मारली आणि कधी आलात, अशी विचारणा करत वडील कसे आहेत?,अशी न चुकता विचारणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर लगेच एकाच गाडीने राहुल गांधी सभेकडे निघाले. याच गाडीत राहुल गांधी आणि आदित्य हे मागच्या सीटवर बसलेले दिसले.

हिंगोलीतील यात्रेत राहुल आणि आदित्य ठाकरे दोघेही सहभागी झाले आणि काही मिनटं एकत्र यात्रेत सहभाग घेतला. त्यानंतर आदित्य यांनी यात्रेतून निरोप घेतला. मात्र राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीची चांगलीच चर्चा झाली.