महाराष्ट्र: पोलिस भरतीमध्ये नाॅन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरून तरुण अडचणीत
पुणे, १० नोव्हेंबर २०२२ः महाराष्ट्र शासनाने पोलिस शिपाई पदासाठी भरती सुरू केली आहे. पण अनेक तरुणांकडे नाॅन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्याने ते भरतीला मुकण्याची शक्यता आहे. हा अन्याय होऊ नये यासाठी यामध्ये सवलत द्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार मागासवर्गातील असून आमचे घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मागील 3-4 वर्षापासून दररोज पोलीस भारतीची तयारी करत आहोत. त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार आहेत. परंतु नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र हे दरवर्षी काढावे लागते. मागील वर्षी पोलिस भरती निघाली नसल्याने आम्ही नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र काढलेले नव्हते. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी ७०० रुपये खर्च येत असतो. भरतीच निघाली नसल्याने विनाकारण पैसे वाया जातात यासाठी आम्ही सन २०२१-२०२२ या कालावधीचे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र काढलेले नाही. आमच्याकडे २०२२-२०२३ या वर्षातील नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र काढलेले आहे.
आताच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये
१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र मागितलेले आहे. तरी आमच्याकडे चालू वर्षाचे १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आहे. तरी हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे अन्यथा आम्हा उमेदवारांचा पोलीस भरतीचा पुन्हा एक चान्स वाया जाण्याची दाट शक्यता आहे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.